Sunday, June 21, 2015

मुसळधार पावसाने मुंबई ठप्प; शाळांना सुट्टी जाहीर

मुसळधार पावसाने मुंबई ठप्प; शाळांना सुट्टी जाहीर



मुंबापुरीत गुरुवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने कधीही न थांबणारी मुंबई आज ठप्प झाली आहे. रेल्वेमार्ग पाण्याखाली गेल्याने मध्य, पश्‍चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा बंद पडली आहे. सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. मुसळधार पावसामुळे महापालिका प्रशासनाने सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली असून, गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्याने मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. रात्रभरापासून पडणार्‍या पावसाने मुंबईत धुमाकूळ घातला असून, मुंबईचा बहुतांश भाग पाण्याखाली गेला आहे. मध्य, पश्‍चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने या तिनही मार्गावरील रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे जागोजागी एक्सप्रेस आणि लोकल उभ्या असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मुसळधार पावासाने दादर, हिंदमाता, माहीम, अंधेरी, जुहू, सांताप्रुझ, मिलन सबवे, मालाड सबवे पाण्याखाली गेल्याने या भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. पावसामुळे सर्व शाळांना एक दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली असून, गरज नसल्यास मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, तसेच समुद्रकिनारी जाणे टाळावे, असे आवाहन महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले आहे.

mithirain3rain1rain2
जूनमधील उच्चांकी पाऊस
मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल 283 मिमी पावसाची नोंद झाली असून गेल्या दहा वर्षांमधला जूनमध्ये 24 तासांत पडलेल्या पावसाचा हा उच्चांक आहे. जून महिन्यात पडणार्‍या पावसाची सरासरीदेखील या पावसाने ओलांडली आहे. जूनमध्ये मुंबईत सरासरी 523 मिमी इतका पाऊस पडतो. मात्र 18 दिवसांत 537 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्याचे 11 दिवस बाकी असतानाच पावसाने महिन्याची सरासरी ओलांडली आहे.
नालेसफाईचा दावा फोल
मुंबईतील नालेसफाईचे काम 95 टक्के पूर्ण झाल्याचा दावा करणार्‍या महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपाचा दावा पावसाच्या पहिल्याच सरीने फोल ठरवला आहे. या पावसामुळे सालाबादप्रमाणे यंदाही हिंदमातासह माहीम, सायन, डोंगरी आणि पश्‍चिम उपनगरातील अंधेरी, सांताक्रूझ, मालाड आदी भाग पाण्याखाली गेल्याने नालेसफाईचा दावा पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचे उघड झाले आहे.
मुसळधार पावसामुळे दिवसभरात शहरात 11, पश्‍चिम उपनगरात 4 आणि पूर्व उपनगरात 4 अशाप्रकारे एकूण 19 झाडे उन्मळून तसेच काही ठिकाणी तुटून पडली. यात 'बेस्ट'च्या एका बसचे नुकसान झाले. वरळी ग्लॅक्सो कंपनी सिग्नलजवळ बस क्रमांक 88 या मंत्रालयाकडे जाणार्‍या बसवर झाड पडले. यात हानी झाल्याचे वृत्त नाही.
मिठीच्या पातळीत वाढ
मुंबईला मुसळधार पावसाने झोडपल्याने मीठी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे माहिमला धोका निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नदी किनार्‍यावर राहणार्‍या नागरिकांना घरे खाली करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे. मात्र, नागरिकांनी घरे सोडण्यास नकार दिल्याचे समजते.
हवामान खात्याने आगामी 24 तासातच कोकण-मुंबईत जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज दिला आहे. त्यामुळेच मुंबईत संभाव्य परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी नौदलाला सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे लष्कराचे नौदल मुंबईकरांना मदत करताना दिसू शकते. मुंबईतील समुद्र किनार्‍यावर ठिकठिकाणी नौदलाची पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच सी किंग हेलिकॉप्टरही प्रसंगी मदतीला धावणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला नियोजित जळगाव दौरा रद्द करून मुंबईत थांबणे पसंत केले आहे. आज दुपारी 12 च्या सुमारास फडणवीस यांनी मुख्य सचिव व मुंबई महापालिकेचे अध्यक्ष अजेय मेहता यांच्यासमवेत पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट दिली. फडणवीस यांनी या विभागाला व प्रशासनाला संभाव्य धोक्याची कल्पना दिली असून, त्याबाबत सूचना केल्या आहेत.

पावसामुळे मुंबईत झाडे, भिंतींची पडझड

मुसळधार पावसाने मध्यरात्रीपासून घातलेल्या धुमाकुळात मुंबईतील अनेक ठिकाणी घरांच्या भिंती आणि झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. नरिमन पॉईंट येथे असलेल्या शालीमार इमारतीच्या दुसऱया आणि तिसऱया मजल्यावरील सज्जा कोसळल्याने 25 वर्षीय युवक जखमी झाला आहे. पावसामुळे मुंबई शहरात 31, पूर्व उपनगरात 10 तर पश्चिम उपनगरात 32 ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. माहीम मधील सिल्वेरा चाळीतील एका घराची भिंत कोसळली असून यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले. वडाळा येथे बॉम्बे डाईंग मिल व ऑटोमॅटिकल इलेक्ट्रिकल कंपनीच्या कंपाऊंडची भिंत बाजूला उभ्या असलेल्या वाहनावर कोसळली तर अन्य एका घटनेत घरावर प्लास्टिक लावण्यासाठी गेलेल्या एका मुलाचा हायटेंशन वायरशी संपर्क आल्याने तो जखमी झाला. उपचारासाठी या मुलाला तात्काळ सायन रुग्णालयात नेण्यात आले.

विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू

दरम्यान, रात्री उशीरा पासून सुरु असलेल्या जोरदार पासावामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये, याकरीता ठिकठिकाणी विजेचा पुरवठा खंडीत केला होता. मात्र वडाळा येथे विजेचा शॉक लागून दोन चिमुरडय़ांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये गोरख कर्णिक (5), रणजीत बुखता (7) या दोघांचा समावेश आहे.

शहरातील ठिकठिकाणचा वीजपुरवठा खंडीत

पावसाच्या तडाख्याने कोणतीही दुर्घटना होऊ नये, याकरीता दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

समुद्रावर सतर्कता बाळगण्याचे आवाहन

नागरिकांनी मुंबईच्या पावसाचा आनंद जरूर घ्या. मात्र, समुद्र बीचवर जाताना नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. चौपाटय़ावरील कठडय़ावर नागरिकानी मौजमस्ती अथवा चालण्याचे टाळावे कारण शनिवारी पहाटे 2 वाजून 29 मिनिटांनी समुद्रात भरती असल्याने, 3.82 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी पुन्हा भरती येणार असल्याने यावेळी 4.33 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पहिल्या पावसामुळे राजकीय वातावरण तापले

पावसामुळे वातावरणात गारवा आला असला तरी पहिल्याच पावसात मुंबई तुंबल्याने राजकीय वातावरण तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे. पालिका विरोधकांनी शिवसेनेवर गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. तर सत्ताधाऱयांनी पालिका अधिकाऱयांना धारेवर धरले आहे. मात्र, यामध्ये सामान्य मुंबईकरांची दयनीय अवस्था झाली आहे.

पुढचे 24 तास धोक्याचे

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांत मुंबई आणि परिसरात अतिवफष्टी होण्याची शक्यता आहे. शनिवारी देखील शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.

http://ekarnala.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%A0%E0%A4%AA/

No comments: